Home लेख देणे समाजाचे…

देणे समाजाचे…

0

काही कामामुळे आपली प्रशंसा झाली की बरेचदा माझे पाय जमिनीवरून उडू लागतात. अशावेळी त्यावर उतारा म्हणून मुद्दाम काही कार्यक्रमांना मी हजेरी लावतो. त्यातला एक कार्यक्रम म्हणजे देणे समाजाचे. त्यात अफाट कामे करणारी अफाट माणसे भेटतात आणि मनातल्या मनात मला अनेकदा ओशाळल्यासारखे वाटते. आपण त्या मानाने अगदी काही करीत नाही ही भावना मनात येऊन जाते हे खरंच. पण मग आपल्या क्षमतेप्रमाणे वगैरे काहीतरी मनात आणून स्वतःची समजूत घालण्याचा प्रयत्न होतो. आजही काही वेगळे घडले नाहीच.

एक गृहस्थ ग्रामीण मतिमंदासाठी निवासी विद्यालय चालवत होते. त्यात सर्व तऱ्हेचे मतिमंदत्व असलेली मुले होती. मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून या विषयात रस होताच. मी अनेक प्रश्न विचारले. त्यांनी अगदी मानसिक चाचण्यांची नावे सांगून, तांत्रिक बाबी स्पष्ट करून वापरून माझे समाधान केले. एका स्टॉलवर वृद्ध, अपंग, आजारी, दुध न देणाऱ्या गायींसाठी काम करणाऱ्या संस्थेचे कार्यकर्ते बसले होते. त्यांच्या आईने आपले मंगळसूत्र गायीला वाचवण्यासाठी गहाण ठेवले होते. त्यापासून पुढे प्रेरणा घेऊन मुलाने कार्य सुरु केले. आम्हाला थंडीत स्वेटर लागत नाहीत कारण शेकडो किलोचा चारा आम्हाला गायींना घालावा लागतो त्याने इतका घाम येतो की स्वेटरची गरजच भासत नाही हे सांगताना ते गृहस्थ हसत होते. पण त्या मागचे कारुण्य मला चटकन जाणवले.

एक गृहस्थ अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर अनाथालयातून बाहेर पडणाऱ्या आणि कुठलेही भविष्य समोर न दिसणाऱ्या मुलांसाठी काम करतात. त्यांच्या समोर आलेल्या बाईंनी काही मुलांना कुटुंबांनी शिक्षणासाठी दत्तक घेण्याची कल्पना मांडली जी त्या गृहस्थांना आवडली. आणि त्यांच्यात चर्चा सुरु झाली. मनात आलं मोठमोठाल्या योजना अशाच आकारास येत असतील. त्या बाईंचे एक वाक्य मनात घुमत राहिले. अठरा वर्षांपर्यंत ही मुले अनाथाश्रमात काढतात. त्यानंतर पुन्हा त्यांना होस्टेल किंवा आश्रम कशाला? त्यांचे पुनर्वसन कुटुंबांमध्ये झाले तर जास्त चांगले. एका ठिकाणी सिग्नलवर खेळत, उनाडपणा करीत वेळ घालवणाऱ्या मुलांची शाळा चालवणारी संस्था होती. सकाळी ९ ते ५ ही मुले यांच्या ताब्यात असतात. त्यांच्यासाठी खाण्यापासून ते अगदी मल्लखांब शिकवण्यापर्यंत सर्व सोयी आहेत.

एका बाईंनी मुलींना अगदी लहान वयात शाळेतून काढले जाते, मग त्यांचे लग्न लावून दिले जाते. अशा मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या संस्थेची महिती दिली. ही संस्था अशा मुलींच्या आईवडिलांना भेटते. रोजचे पोट हातावर असणाऱ्या त्या कुटुंबाला मुलीच्या शिक्षणाचे वर्षाचे तीन चार हजार परवडणार नसतातच. त्यापेक्षा लग्न लावून दिले तर मुलीची सोय होणार असते. शिवाय लग्ना निमित्त नातेवाईक भांडीकुंडी देणार असतात तो फायदा असतो. अशांकडे जाऊन या संस्थेने त्या मुलींच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. शिक्षणाचा खर्च होणार असेल तर आईवडीलांची हरकत नव्हती. अशातऱ्हेने मुलींच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला होता.

एकेका संस्थेची वेगवेगळी आव्हाने होती. ती आव्हानं ही माणसे समर्थपणे पेलत होती. पण सरकारची फारशी मदत नव्हती. त्यामुळे समाजाला ही माणसे आवाहन करीत होती. शेवटच्या स्टॉलवर देणे समाजाचे उपक्रमाच्या वीणाताई गोखले बसल्या होत्या. माझ्या मनातल्या मैत्र या वेबसाईटबद्दल त्यांना सांगितले. त्यात संस्थांची माहिती देण्याची माझी इच्छा होती. त्यांना कल्पना आवडली. मात्र त्यांनी आपल्या काही शंका मांडल्या. वेबसाईटचा एक परिणाम असाही होऊ शकेल की माणसे साईटवरून दान देतील पण उपक्रमाकडे पाठ फिरवतील. हे काम प्रत्यक्ष येऊन पाहणे, त्या माणसांना भेटणे हे वीणाताईंना महत्वाचे वाटत होते. वेबसाईटमुळे ते होणार नव्हते. कदाचित टाळले जाणार होते. हा मुद्दा मला रास्त वाटला आणि पटला देखील. वीणाताईंसारख्या अनुभवी माणसांच्या विचारांमधली परिपक्वता जाणवलीच पण माझा वैचारिक कच्चेपणाही लक्षात आला. यापुढे समाजकार्याचा विचार करताना अनेक दृष्टिकोणातून विचार करणं भाग आहे अशी खुणगाठ मनाशी बांधली.

बाहेर पडताना पाय पुन्हा जमिनीवर आल्याची जाणीव झाली होती.

अतुल ठाकुर

देणे समाजाचे उपक्रमाची वेबसाईट

Exit mobile version