About us

भूमिका

स्वमदत गट किंवा सपोर्ट ग्रूप हा माझ्या संशोधनाचा आणि तितकाच जिव्हाळ्याचा विषय. समाजशास्त्रात पीएचडी करण्यासाठी हा विषय निवडला आणि या विषयाच्या प्रेमातच पडलो. एकच समस्या असलेल्या अनेक व्यक्ती एकत्र येऊन काय चमत्कार करु शकतात हे मुक्तांगणच्या पाठपुरावासभेत पाहिलं, एपिलेप्सीसाठी काम करणाऱ्या संवेदनामध्ये पाहिलं, आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळातही पाहिलं. तरीही आपल्या समाजात स्वमदतगटाचं महत्व अजूनही पुरेसं ओळखलं गेलं आहे असं मला वाटत नाही. याचं एक कारण मला माहितीचा अभाव हे वाटतं. हा अभाव निदान काही अंशी दूर व्हावा म्हणून या संकेतस्थळाची योजना केली आहे. येथे अनेक समस्यांवर चालणाऱ्या स्वमदतगटांची माहिती देण्याचा आमचा मानस आहे.

त्यासोबतच अनेक माणसे आणि संस्था समाजाच्या तळागाळात काम करीत असतात. प्रसंगवशातच आपल्याला त्यांच्या कामाची ओळख होते. अशा काही कार्यक्रमांना मी गेल्या काही वर्षात हजेरी लावली, मुक्तांगणचा ‘डॉ. अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार’ हा कार्यक्रम, ‘सरस्वती विद्यामंदीर संस्थेचा कार्यक्रम’, ‘देणे समाजाचे’ यांचा उपक्रम असे काही कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिले. तेव्हा ऐकून अक्षरशः थक्क व्हावं अशी कामं करणारी माणसे भेटली, त्यांच्या संस्थांची माहिती मिळाली. अशा संस्थांच्या, माणसांच्या कामाची ओळख करून द्यावी म्हणूनही हे संकेतस्थळ तयार केले आहे.

आप्त”बद्दल

कामानिमित्ताने अशा अनेक व्यक्तींशी परिचय झाला. त्यांना मी माझे आप्तच मानतो. या माणसांवर लिहिलेले लेख हे प्रेरणादायी ठरतील असे वाटले म्हणून त्यांचा समावेश येथे केला आहे.

मैत्रचा उद्देश

गरजू लोकांना आवश्यक त्या संस्थांची माहिती लगेच मिळावी हा मैत्रचा एकमेव उद्देश आहे. समाजसेवी संस्थांसोबत काम करताना योग्य माहितीच्या अभावी माणसांचे नुकसान झाल्याची उदाहरणे पाहिली. मैत्रमुळे योग्य संस्थाच्या कामाची माहिती लोकांना व्हावी, लोकांच्या गरजा पूर्ण व्हाव्या हा मैत्रचा उद्देश आहे.

येथील माहितीबद्दल

येथे माहिती देताना संस्थांनी दिलेली माहिती (बॅंक डिटेल्स वगळता) जशीच्या तशी काहीही बदल न करता टाकण्यात आली आहे. येथील माहिती ही अशा सेवा पुरवल्या जातात हे लोकांना माहीत असावे आणि अडीअडचणीच्या वेळी या माहितीचा त्यांना उपयोग व्हावा या सद्भावनेने दिली आहे. या माहितीच्या अचूकतेबद्दल आम्ही कसलीही जबाबदारी घेतलेली नाही. येथे दिलेल्या लिंक्सवरून ज्या बेवसाईटसवर माणसे जातात त्या साईटवरील माहितीचीही जबाबदारी आमची नाही. सबब मैत्र या संकेतस्थळाचा वापर प्रत्येकाने आपल्या जबाबदारीवर करावा ही नम्र विनंती.

संस्थांचे बॅंक डिटेल्स का नाहीत?

मैत्र ही साईट निरनिराळ्या संस्थांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी आहे. देणगी द्यायची असल्यास या संस्थांच्या माणासांशी बोलणे, त्यांच्या कार्याला प्रत्यक्ष भेट देणे, त्यांचे काम पाहणे हे महत्वाचे आहे असे माझे मत आहे. देणे समाजाचे कार्यक्रमाला भेट दिली असताना तो उपक्रम चालवणाऱ्या वीणा गोखले यांनी काम प्रत्यक्ष पाहण्याचा, काम करणाऱ्या लोकांना भेटण्याचा मुद्दा मांडला होता. जो मला पटला. मैत्र ही साईट कामाची माहिती देऊ शकेल. पण ही कामे करणाऱ्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटण्याची गरज मैत्र पूर्ण करु शकणार नाही. या मैत्रच्या मर्यादा आहेत. त्यासाठी “देणे समाजाचे” सारखे कार्यक्रमच जास्त उपयुक्त आहेत असे मला वाटते.

मैत्रची सेवा सध्यातरी निःशुल्क आहे.

मैत्रची सेवा आम्ही निःशुल्क ठेवलेली आहे. पैसे न घेतल्यास माणसांना दिलेल्या सेवेची किंमत नसते असे मानणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. त्यांच्या म्हणण्यात तथ्यही आहे. शिवाय अशी साईट चालवायला पैसे लागतातच. पण येथे दिल्या गेलेल्या बहुतेक संस्थांचे काम लोकांनी दिलेल्या देणगीवरच चालते. असे असताना मैत्रसाठी त्यांनी पैसे भरावे हे कुठेतरी पटत नव्हते. म्हणून शक्यतोवर पदरमोड करून हे काम करायचे ठरवले आहे.

कृतज्ञता

येथे दिलेल्या संस्थांचे कार्य इतके अफाट आहे की त्यांच्या काही अंशानेही काम मला करता येणार नाही याची मला नम्र जाणीव आहे. फक्त ही माणसे करीत असलेल्या समाजाच्या सेवेत आपलाही खारीचा वाटा असावा इतकीच कृतज्ञतेची आणि प्रांजळ सद्भावना या संकेतस्थळाच्या निर्मितीमागे आहे. मैत्रच्या निमित्ताने कुणाला आवश्यक ती माहिती, वेळ न दवडता मिळाली, त्यांची गरज भागली आणि त्यांना थोडी जरी मदत झाली तरी मैत्रच्या निर्मितीचा उद्देश पूर्ण झाला असे मला वाटेल.

अतुल ठाकुर

(या संकेतस्थळाचे प्रकाशन माझ्या आईच्या हस्ते म्हणजे श्रीमती शुभांगी ज. ठाकुर यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दिनांक २२/३/२०२३ रोजी झाले. तिच्याच आशीर्वादाने हे संकेतस्थळ निर्विघ्नपणे सुरु आहे.)