Homeआरोग्यविषयकनर्मदा किडनी फाऊंडेशन

नर्मदा किडनी फाऊंडेशन

दिवसेंदिवस वाढणारे किडनी रुग्णांचे प्रमाण, किडनी विकारांची वैद्यकीय गुंतागुंत, आणि त्याचे आर्थिक तसेच सामाजिक परिणाम पाहिल्यावर डॉ. भरत शहा या द्रष्ट्या किडनीविकार तज्ञाला किडनीविषयी जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थेची गरज लक्षात आली. ह्याच ध्यासाने प्रेरीत होऊन, कुटुंबातील इतर सदस्य आणी समविचारी लोकांना बरोबर घेऊन त्यांनी १९९३ साली, त्यांची आई श्रीमती नर्मदा वल्लभदास शहा यांच्या स्मरणार्थ “नर्मदा किडनी फाऊंडेशन” या नोंदणीकृत गैरसरकारी स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. गेली तीस वर्षे कार्यरत असलेली “नर्मदा किडनी फाऊंडेशन” ही किडनी रुग्णांसाठी काम करणारी, देशातील एक मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून गणली जाते.

नर्मदा किडनी फाऊंडेशनची प्रमुख उद्दिष्टं आहेतः

  • किडनीची काळजी घेणे आणि किडनीच्या विकारांपासून दूर राहणे ह्याविषयी लोकांना मार्गदर्शन करणे.
  • किडनी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना किडनी विकारांसंबंधी आणि उपचारासंबंधी माहिती देणे.
  • किडनी रुग्णांना मनोबळ देऊन, त्यांना किडनीच्या विकारांना तोंड देण्यास मदत करणे.
  • समाजात अवयवदानासंबंधी जागृती करून लोकांना अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहीत करणे.

नर्मदा किडनी फाऊंडेशन आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करते. आणि स्थापनेपासून फाऊंडेशन हजारो लोक आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचले आहे.

एका दृष्टीक्षेपात प्रमुख कार्यक्रम खालीलप्रमाणेः

  •  जागरुकता कार्यक्रम – फाऊंडेशन आपल्या सदस्यांसाठी आणी सामान्य लोकांसाठी सतत किडनी रोग जागरुकता चर्चा आयोजित करते. दर बुधवार १२:३० ते २:३० या वेळात मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी विनामुल्य ऑनलाईन मूत्रपिंड कार्यशाळा आयोजित केली जाते.
  • मार्गदर्शक कार्यक्रम – अभ्यास वर्ग, तज्ञ डॉक्टरांचे चर्चासत्र, अशा कार्यक्रमांच्या द्वारा किडनीच्या विशिष्ट पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जातो.या कार्यक्रमात अवयवदानाबद्दलही जनजागृती केली जाते. असे कार्यक्रम, बॅंका, ऑफिसेस, शाळा, कॉलेजेस, गृहसंकूल वगैरे ठिकाणी विनामुल्य आयोजित केले जातात.
  • आरोग्य तपासणी शिबिरे – मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब ही किडनी विकारांची प्रमुख कारणे आहेत. किडनी विकारांचे निदान लवकर होण्यासाठी, विनामुल्य नियमित तपासणी शिबिरे आयोजित केली जातात.
  • लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब अणि मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी आहार मार्गदर्शन – रुग्णांसाठी आवश्यक आहारातील बदलांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी, फाऊंडेशन नियमितपणे आहार शिबिरे/कार्यशाळा आयोजित करते. लोकांना निरोगी आहाराच्या सवयींबद्दल मार्गदर्शन केल्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब रोखण्यात आणि त्यावर उपचार करण्यात खूप मोठा हातभार लागतो.
  • अवयव दाता दिन – नर्मदा किडनी फाऊंडेशन लोकांना अवयव दान करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी, दर वर्षी, ३० नोव्हेंबर हा दिवस अवयव-दाता दिन म्हणून साजरा करते. या दिवशीच्या उत्सवात त्या वर्षात अवयव दान केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. मृत्यूनंतर आपल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तीचे अवयव दान करण्यास संमती दिलेल्या कुटुंबीयांचाही या दिवशी सन्मान केला जातो.
  • अवयवदानाबद्दल जनजागृती – अवयवदाना विषयी जनजागृती करण्यासाठी फाऊंडेशन विविध प्रदर्शनांमध्ये स्टॉल्स लावणे, विविध ठिकाणी माहितीपर बॅनर्स लावणे, अवयवदानावर व्याख्याने आयोजित करणे, पथनाट्ये करणे वगैरे उपक्रम करते.
  • ट्रान्सप्लांट गेम्स – २००८ सालापासून फाऊंडेशन मुंबईत अवयव दाता आणि अवयव प्राप्तकर्त्यांसाठी राष्ट्रीय पातळीवर प्रत्यारोपण खेळांचे आयोजन करते. ट्रान्सप्लांट गेम्सचे ध्येय हे दाखवणे आहे की प्रत्यारोपणानंतर अवयव दाता आणि अवयव प्राप्तकर्ता सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगू शकतात!
  • विविध स्पर्धांचे आयोजन – नर्मदा किडनी फाऊंडेशन किडनीची काळजी कशी घ्यावी तसेच किडनी विकार आणि अवयव दान ह्याविषयी जनजागृती करण्यासाठी लघुपट, घोषवाक्य पोस्टर्स, कविता या स्पर्धांचे आयोजन करते.

अधिक माहितीसाठी संपर्क
मोबाईल: 7045552030 / 9769570556 / 9870899486
Website: www.narmadakidney.org

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments