Homeशैक्षणिकअल्पारंभा एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन

अल्पारंभा एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन

वैयक्तिक अथवा गट स्वरूपातील असंघटीत समाजोपयोगी कार्याला अधिक संघटितरित्या आणि परिणामकारक स्वरूपात पुढे न्यावे हा विचार करून, समविचारी सहकारी व मित्रपरीवाराच्या प्रेरणेने २०१८ साली अल्पारंभा एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन’ चा उदय झाला. संस्थेची प्राथमिक उद्दिष्ट्ये ठरवितांना, अर्थातच समाजावर प्राथमिक परिणाम करणारी, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्र ही प्रामुख्याने विचारात घेतली गेली. या दोन्ही विषयांच्या कक्षेत कार्य करतांना, त्यातील विविध निकडी ओळखून, त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करणे आणि त्या निगडीत उपक्रम राबवणे हे अप्लारंभाचे प्राथमिक उद्दिष्ट्य आहे.

संस्थेची उद्दिष्ट्ये

शैक्षणिक क्षेत्रांच्या कक्षेत, समाजोपयोगी उपक्रम राबविणे

सांस्कृतिक क्षेत्रांच्या कक्षेत, समाजोपयोगी उपक्रम राबविणे

आर्थिक साक्षरता-प्रचार आणि प्रसार’ यासाठी उपक्रम राबविणे

शैक्षणिक क्षेत्र: महाराष्ट्रातील विविध संस्थांमध्ये जी दिव्यांग मुले शिक्षण घेत आहेत, जेथे अपुऱ्या शैक्षणिक सुविधांच्या अभावे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनात अडचणी आहेत, तेथे अल्पारंभा फौंडेशनद्वारे मदतीचा हात पुढे केला जातो आहे. याद्वारे आजपर्यत अनेक संस्थांसाठी मदत कार्य उभे राहिले आहे. यामध्ये..

१) कर्णबधीर विद्यार्थ्यांना, शिक्षणाच्या प्रमुख प्रवाहात आणणारी संस्था : श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय , नासिक

२) विशेष मुलींच्या प्रगतीसाठी समर्पित संस्था : घरकुल परिवार संस्था

३) अंध बंधू-भगिनींच्या विकासासाठी कार्यरत : नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड्स अर्थात NAB, सातपूर

४) तसेच विवेकानंद केंद्र आश्रमशाळा पिंपळद, वयोवृद्ध रुग्णांना आपलेसे करणारी संस्था : दिलासा, ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना प्रगत शिक्षण, जीवनस्तर मिळावा यासाठी समर्पित संस्था:पूर्वांचल सेवा समिती, समतोल जीवशैलीसाठी ध्यान साधना पुरस्कृत करणारे नासिक विपश्यना केंद्र आदी अनेक संस्थांचा उल्लेख करता येईल. शैक्षणिक क्षेत्रात मराठी भाषा संवर्धन यासाठीही फाउंडेशन कार्यरत आहे. या आयमाखाली, “वयम वाचक कट्टा”, “कविता मनातल्या”, “मिले सुर मेरा तुम्हारा”, “सुलेखन, हस्ताक्षर, निबंध स्पर्धांचे आयोजन” इ. पूरक उपक्रम राबविले जातात.

सांस्कृतिक क्षेत्र :सांस्कृतिक क्षेत्रामध्येही फाउंडेशनद्वारे विविध उपक्रम घेतले जातात. यामध्ये नासिक तसेच देशभरातील संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना, त्यांच्या कला प्रस्तुतीसाठी मंच उपलब्ध करून देणे, संगीत कलेच्या प्रसारासाठी अनेक ख्यातीवंत, नामांकीत कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करणे अशा उपक्रमांचा समावेश आहे.

अर्थ साक्षरता अभियान:फौंडेशनच्या कार्याचा अजून एक आयाम म्हणजे “अर्थ साक्षरता अभियान”! देशातील आर्थिक साक्षरतेचे प्रमाण केवळ २३% आहे. ही देशाच्या प्रगतीच्या मार्गात अडसर ठरणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच सामाजिक अर्थ साक्षरता वृद्धिंगत व्हावी, यासाठी अल्पारंभा द्वारे सतत विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये “अर्थ साक्षरता क्लब” ची स्थापना करणे, आर्थिक साक्षरता विषयावर मार्गदर्शनपर सत्रे, उपक्रम घेणे, ब्लू बूक, मनोमनी,गवाक्ष आदी साहित्य निर्मिती आणि प्रकाशन अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. “आधी केले मग सांगितले “, या उक्तीनुसार आता आपल्यालाही ह्या सहजशक्य कार्यक्षेत्रात, प्रवण होण्याचे आवाहन फाउंडेशन द्वारे नेहेमी केले जाते. आमच्या समाजोपयोगी कार्यास हातभार लावण्यास आपल्याही सक्रीय सहभागाचे स्वागत आहे !!

अप्लारंभाविषयी अधिक माहिती: www.alparambha.com ,
ई-मेल:alparambha@gmail.com , दुरध्वनी: ९०११८९६६८१

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments