Homeआप्तआमच्या शोभनाताई…!

आमच्या शोभनाताई…!

शोभनाताईंशी पहिली भेट मुक्तांगणच्या डॉ. अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान झाली. भेटायचे आधी ठरले होतेच. त्यावर्षीचा पुरस्कार शोभनाताईंच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाला मिळाला होता. शोभनाताईंचा नेटवरुन परिचय आमचे ज्येष्ठ स्नेही कोल्हापूरचे श्री.अशोक पाटील यांनी करुन दिला होता. कुणी पूजनीय असे व्यक्तीमत्व दिसले कि आमच्या अशोकरावांना त्यांच्याबद्दल सर्वांना सांगितल्याशिवाय राहवत नाही. त्यांच्या या दुर्मिळ गुणामुळे आज अनेकांशी मैत्री झाली आहे. शोभनाताईंबद्दल मात्र अशोकरावांचा स्वर आदर आणि भक्तीभावाचाच असे. त्यातुन त्या “डॉ.” शोभनाताई आणि त्यातुन त्यांचा संबंध समाजशास्त्राशी. या सर्व बाबी धडकी भरवणार्‍या होत्या. मात्र फोनवर बोलल्यापासुन भीती कमी झाली होती. मेलवर सुद्धा त्यांची उत्तरे अतिशय सौम्य भाषेत येत असत. हे सारे जरा विद्वानांच्या मला आलेल्या अनुभवाशी वेगळे होते. पुरस्कार सोहोळ्याला मी थोडासा आधी जाऊन मुक्तांगणच्या सहकार्‍यांशी गप्पा मारत उभा होतो. त्यावेळी सौम्य व्यक्तीमत्वाच्या एक बाई दिसल्या. त्यांना कसे लक्षात आले कोण जाणे पण त्यांनी थेट माझ्याकडेच पाहुन विचारले “अतुल ठाकुर?”..हे शोभनाताईंचे मला घडलेले पहिले दर्शन. त्यानंतर माझ्याकडुनबरेचदा होतो तो गाढवपणा घडलाच. त्यांना बसायला काही आणुन देण्याचे राहुनच गेले आणि मी त्यांच्याशी बोलण्यातच गुंतुन गेलो. त्या इतक्या काही घरगुती पातळीवर समोरच्याला आणतात कि थोड्याच वेळात आपल्याला वाटावं आपण अनेक वर्षे यांना ओळखत असु. शेवटी समोरची खुर्ची पाहुन त्याच म्हणाल्या, मी जरा बसु का? आणि मी खजील झाल्याचे न दाखवता बोलणे सुरु ठेवले. या गोष्टीचा दोष फारसा माझ्याकडे येत नाही कारण मुळात इतकी विद्वत्ता असुनही जमीनीवर पाय असलेली माणसे सोशियॉलॉजीत पाहण्याची मला सवयच नाही. त्यामुळे जरा भान विसरुन गेलो होतो. त्यांच्यासोबत त्यांचे पती श्री. गोपाळ तीर्थळी देखिल होते. गोपाळकाका मला तेव्हाही पार्कीन्सन्सने आजारी आहेत असे वाटले नाही आणि आजही वाटत नाहीत. कार्यक्रमात शोभनाताई त्यांच्या सहकार्‍यांसोबत स्टेजवर होत्या. लक्षात राहीला तो त्यांचा खणखणित आवाज आणि पहिल्या भेटीत थेट माझ्याकडे पाहणारे डोळे. ते एका संशोधकाचे डोळे होते. आणि शोभनाताईंशी जितका संबंध त्यानंतर आला त्यातुन मला त्यांच्यातला संशोधकच प्रकर्षाने जाणवत गेला.

पुढे मी पार्किन्सन्स मित्रमंडळाची वेबसाईट बनवली. आणि त्याबाबतीत शोभनाताईंचाच पुढाकार असल्याने त्यांच्याशी संबंध येत गेला. फोनवर, मेलने बोलणे होत राहिले. एकदा मित्रमंडळाची सभासुद्धा अटेंड केली. त्यावेळी शोभनाताईंच्या प्रत्यक्ष कामाची काहीशी कल्पना आली. त्यांच्या सहकार्‍यांशीही त्यावेळी भेटीगाठी झाल्या. वेबसाईट बनवल्यावर ती अपडेट करण्यासाठी शोभनाताई नियमित माहिती पाठवत राहिल्या. काही वेळा बारीकसारीक चुका टायपिंगमध्ये होत. अशावेळी नम्रतेची पराकाष्ठा करीत त्या क्षमा मागुन पुन्हा मेल पाठवित असतात. कुठलेही काम देताना तर सोडाच, पण साधा फोन केल्यावरही वेळ आहे का बोलायला असं विचारतात. माझ्या थिसिसच्या प्रगतीकडे त्यांचे बारीक लक्ष होते. इतर कामांमुळे थिसिस तर मागे राहात नाही ना या बद्दल त्यांना काळजी वाटत होती. अनेकदा त्या ती बोलुन दाखवित. माझ्या थिसिससाठी पार्किन्सन्स मित्रमंडळाचा डेटा त्यांनी स्वतः गोळा केला हे मला अत्यंत कृतज्ञतेने नमुद करावंसं वाटतं. मुक्तांगणमध्ये माझ्या लेखांचे कौतुक झाल्यावर त्यांनी मुद्दाम मेल करुन आनंद झाल्याचे कळवले. पार्किन्सन्स मित्रमंडळाची जबाबदारी शिरावर घेतलेल्या शोभनाताईंच्या स्वभावातील हा उमदेपणा, सतत काम करण्याची वृत्ति, त्यांचा अभ्यास, तो अभ्यास पचवुन त्यांनी टिकवलेला नम्रपणा हे सारं मला आकर्षित करीत होतंच. त्यामुळे व्यसनाशिवायही जगात अनेक दु:खं आहेत आणि ती व्यसनापेक्षाही भयंकर आहेत, त्यावर मात करुन माणसे आपले आयुष्य सुरेल करुन यशस्वीरित्या जगत असतात हे मुक्तांगण मित्रांना कळावं म्हणुन जेव्हा आम्ही “व्यसनाच्या पलिकडले” हे सदर आनंदयात्रीमध्ये सुरु केलं तेव्हा शोभनाताईंची मुलाखत घ्यायचं हे मी ठरवुनच टाकलं. पतीला सोळा वर्षापूर्वी साधारण १९९९ मध्ये पार्किन्सन्सचे निदान झालेले. त्यानंतर घरातील तिन्ही मुलिंची लग्ने झालेली. स्वत: शोभनाताई निवृत्तिच्या उंबरठ्यावर आणि वयोमानानुसार त्यांनाही काही व्याधींचा त्रास होत असलेला. अशा अवस्थेत शोभनाताईंनी या गोष्टींना तोंड कसे दिले याबाबत एक सामान्य माणुस म्हणुन आणि समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणुन मला दुहेरी आकर्षण होते. भेटायचं अनेकदा ठरवुन जमत नव्हतं शेवटी काल तो योग आला आणि मुक्तांगणमधली कामे आटोपुन त्यांच्या घरी निघालो.

रिक्षावाल्याला एरिया माहित नव्हता त्यामुळे बर्‍यापैकी अनेक गल्ल्या फिरवत शोभनाताईंच्या बंगल्यापर्यंत पोहोचवले. तोपर्यंत शोभनाताई सतत फोनवर सूचना देत होत्या. आम्हाला घर पटकन दिसावं म्हणुन त्या बाहेर उभ्या राहिल्या. शेवटी शेजारच्या बाई ज्या स्कूटरवर चालल्या होत्या त्यांनाही त्यांनी आम्ही दिसल्यास आम्हाला रस्ता सांगण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे मी घरी पोहोचलो. मला संध्याकाळी लवकर निघायचे होते त्यामुळे वेळ घालवायचा नव्हता. पण काही घरांमध्ये आणि माणसांमध्येच असा काही घरगुतीपणा असतो कि तेथे आपण सुखावतो. थोडं रिलॅक्स व्हावंसं वाटतं. त्यातुन शोभनाताईंनी अगदी गावच्या प्रथेप्रमाणे आधी हातपाय धुण्यास सांगितले. आणि त्यांच्याकडे गावातल्याप्रमाणेच असलेला मोठा तांब्या पाहुन तर मी गारच झालो. त्या घरातलं गावच्यासारखं ऐसपैस अनौपचारीकपण मी निघेपर्यंत सतत जाणवत राहिलं. मुलाखत घेताना समोर शोभनाताई आणि बाजुला गोपाळकाका बसले होते. शोभनाताईंनी मंडळाबद्दलच बोलण्यास सुरुवात केली. मंडळाला देणग्या मिळतात पण पैशांपेक्षा आता कार्यकर्त्यांची निकड जास्त आहे. या भूमिकेतुन “देणे समाजाचे” कार्यक्रमात लोकांना आवाहन केले होते. ५६ जणांनी कार्यकर्ता म्हणुन नाव दिले आणि जेव्हा त्यांना सभेसाठी बोलावले तेव्हा फक्त आठच जण आले, शोभनाताई हसुन सांगत होत्या. मात्र जे आले त्यांनी अनेक जबाबदार्‍या अंगावर घेतल्या आहेत आणि ते अगदी नियमित आहेत. ही मंडळी हौसेने कामं अंगावर घेत आहेत आणि ती कामं त्यांना किरकोळ वाटतात पण त्यामुळे सभासदांवरचा बोजा खुपच कमी होतो. आमच्या मंडळाचे छोटेछोटे कार्यक्रम लोकांना आवडतात. वाढदिवस साजरे होतात. ग्रिटींग्ज दिले जातात. कुणी चहा देतं, कुणी पेढे वाटतं, नृत्योपचाराचा वर्ग आहे. मंडळात असे अनेक जण आहेत ज्यांच्या घरचे पार्किन्सन्सचे रुग्ण आता निवर्तले पण ही मंडळी यायची थांबली नाहीत. इतकं यांचं मंडळाशी नातं आता कौटुंबिक जिव्हाळ्याचं झालं आहे. लोहचुंबकाने आकर्षुन घ्यावं तसं अनेकांना मंडळाने आकर्षुन घेतलं आहे. मंडळाचा कर्यक्रम असला कि रणरणत्या उन्हात तीन तीन मजले चढुन मंडळी गाण्याच्या सरावासाठी जातात अशा तर्‍हेचा आमचा परिवार झाला आहे, शोभनाताई आनंदुन सांगत होत्या. शोभनाताईंना विचारल्याशिवाय त्या स्वतःबद्दल बोलणार नाहीत हे माझ्या लक्षात आले आणि मी प्रश्न विचारायला सुरुवात केली.

साधारणपणे १९९९ च्या सुमारास यांना (गोपाळकाकांना) पार्किन्सन्स चे निदान झाले. पेपर वाचताना यांचा हात हलत असे. मात्र अगदी सुरुवातीची स्टेज होती. गोळ्या घेण्याची आवश्यकता नाही असे डॉक्टरने सांगितले. शोभनाताई सांगु लागल्या. मात्र पती हे सुरुवातीपासुन कामाचं व्यसन असलेले. जनरल मॅनेजरच्या पोस्टपर्यंत पोहोचलेले इंजिनियर, कामगार वर्गात काम करुन घेण्याबद्दल ख्याती असलेले आणि लोकप्रिय. त्यांच्या शारिरीक हालचाली अचानक मंदावल्या आणि त्यांना अतिशय दु:खाने नैराश्य येऊ लागले. त्यांचा स्वभाव खुपच हळवा झाला. पटकन रडु येत असे. यामुळे जे उपाय कुणी सांगेल ते करण्याचा सपाटा सुरु झाला. काही अ‍ॅलोपथी डॉक्टरांनीच अ‍ॅलोपथी न करण्याबद्दल सुचवले होते. त्यामुळे ते सोडुन, आयुर्वेद, होमिओपथी, अ‍ॅक्युप्रेशर, अ‍ॅक्युपंक्चर, फार काय, वैदु सुद्धा घरी बोलावला. गोपाळकाकांना सारे काही करुन पाहायचे असे. लवकर बरे वाटण्याशी कारण. शोभनाताईंना हे पटत नसे पण पतीसाठी त्या काही बोलत नसत. पुढे पुढे या आजाराची माहीती आजुबाजुला झाली तेव्हा काही धूर्त मंडळी संधान बांधुन पाखंडी लोकांना यांच्याकडे पाठवु लागली. एकदा तर शोभनाताई घरी आल्या तेव्हा एकजण लोखंडी पात्याने गोपाळरावांच्या हाताचं रक्त काढत होता. अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी. त्यांनी त्याला हकलुन लावले. नंतर मात्र ही दोघे सावध झाले. यांच्या ड्रावव्हरलाही या फसवणुकीची कल्पना आली आणि तोही अशा लोकांना बाहेरुच हकलुन देऊ लागला. या सार्‍यात पैसा मात्र अमाप गेला. एकदा एकदम पंचवीस हजारांची रक्कमदेखिल खर्च झाली होती. मग मात्र यांच्या डॉक्टर मित्रांनीच चंग बांधला आणि डॉ. दिवटेंकडे यांना जायला जवळपास सक्तीचेच केले. तोपर्यंत २००७ साल उगवले होते. फारसे योग्य उपचार न करताच सात वर्षे उलटली होती. फक्त व्यायाम नियमित सुरु होता. मात्र योग्य डॉक्टरकडे गेल्यावर मात्र गोपाळकाकांना फायदा होउ लागला. याच वर्षी यांचा संबंध करमरकर, शेंडे, पटवर्धन आणि कुलकर्णी या मंडळींशी आला आणि यांनी पार्किन्सन्स मित्रमंडळात जाण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोघांनी मागे वळुन पाहिलंच नाही. दोघा पतीपत्नींनी या कार्यात स्वतःला झोकुन दिलं. मंडळात जायला लागल्यापासुन आता आम्ही पार्किन्सन्सला पुर्णपणे विसरुन गेलो आहोत असे दोघेही म्हणाले.

मंडळाचे अनेक कार्यक्रम होतात. पैकी वेबसाईटचे काम शोभनाताईंच्या पुढाकाराने सुरु झाले. त्यांच्यातल्या संशोधकाला मंडळाच्या कामाची आणि त्यातुन जमत असलेल्या माहितीचा ठेवा सुरक्षित ठेवण्याची, सर्वांपर्यंत पोहोचविण्याची निकड वाटत असावी. मंडळाच्या महिन्याच्या सभा, त्याचे निवेदन देणे, वृत्तान्त लिहिणे हे देखिल काम त्यांच्याकडे असते. ऐन सभेच्यावेळी त्यांची लगबग पाहायलाच नको. चहाची व्यवस्था करण्यापासुन ते वक्याची व्यवस्था ठेवण्यापर्यंत सर्व कामात त्यांचा सहभाग असतो. मंडळाची वर्गणी, मंडळाने प्रकाशित केलेली पुस्तके, मंडळाचे सहलींसारखे कार्यक्रम, सभांसाठी वक्त्यांना बोलावणे या मध्ये शोभनाताई असतातच. पण घरी गेल्यावरही न आलेल्या सभासदांना फोन करणे, त्यांची विचारपूस करणे, त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणे ही कामे सुद्धा त्यांनी अंगावर घेतली आहेत. त्या फोनवरुन समुपदेशन करतात. त्यामुळे अनेकांचे फोन त्यांना येत असतात. त्यांच्याशी बोलुनच लोकांना बरे वाटते. ही फोनवरची मैत्री तर इतकी दृढ झाली आहे कि काही जण शोभनाताईंना कुणाला त्यांच्या फोनची यावेळी गरज आहे, मानसिकदृष्ट्या कोण डाऊन आहे हे कळवतात. प्रत्यक्ष भेट नेहेमी होतेच असे नाही. पण मनापासुनची तळमळ, प्रेम हे आवाजातुन पोहोचतेच. त्याशिवाय पुष्पौषधी हा शोभनाताईंचा आवडीचा प्रान्त. पैसे न घेता सेवा करण्याची हौस. त्यामुळे त्यांच्याकडे पेशंटची ये जा असे. मनोविकारांवर अनेकदा चांगले अनुभव आलेल्या या औषधोपचारांनी एकदोघा आत्महत्या करायच्या टोकाला पोहोचलेल्यांना शोभनाताईंनी त्यातुन बाहेर काढले आहे. त्याशिवाय रेकी सुद्धा त्या शिकल्या आहेत. या वयात ही लगबग अनेकदा शोभनाताईंना झेपत नाही आणि त्या आजारी पडतात. मग त्यांच्या मुली त्यांना आपल्या घरी घेऊन जातात. सक्तीने विश्रांती घ्यायला लावतात. कंप्युटरवर बसण्याची बंदी करतात. मंडळाच्या कामापासुन अशा तर्‍हेने दुर झाल्यावर शोभनाताईंची तगमग होते आणि बहुधा ते काम लवकरात लवकर पुन्हा करायला मिळावं म्हणुनच त्या बर्‍या होतात.नुसती कामं करणारी अनेक माणसं असतात. पण एखादी गोष्ट मिशन म्हणुन अंगावर घेऊन त्यात झोकुन देणारी माणसे दुर्मिळ. शोभनाताईंच्या या झोकुन देण्याचा अनुभव मला आला आहे.

त्यांना बारीकसा जरी सल्ला विचारला तरी त्या स्वतःहुन फोन करणार, स्वतःचे मत सविस्तर सांगणार, त्यातील खाचा खोचा समजवुन देणार, स्वतः समजवुन घेणार, अगदी समाधान होईपर्यंत बोलणार आणि त्याची तड लावणार. टाळाटाळ करताना मी त्यांना कधीच पाहिलं नाही. ही “कमिटेड” माणसांची खासियतच असते. समस्येच्या मुळाशी जाऊन भिडायचं. एखाद्याला मदत करायची तर अगदी सर्वस्व ओतुन करायची. मंडळात बाहेरुन डॉक्टर मंडळी व्याख्यान देण्यासाठी येतात. अनेक हॉस्पिटल्सचा संबंध मंडळाशी येतो, अनेक संस्था मंडळाशी संपर्क करतात. काहींना पार्किन्सन्सवर संशोधन करायचे असते त्यासाठी मंडळाची मदत हवी असते. “देणे समाजाचे” सारखे कार्यक्रम असतात. त्यातुन कार्यकर्ते मिळवायचे असतात. डॉ. मंदार जोग यांच्यासारखी जागतिक किर्तीची तज्ञ मंडळी मंडळात येऊन भाषणे करतात. या सार्‍यांशी शोभनाताईंचा संपर्क असतो. अशा वेळी त्यांना ही कामे पार पाडण्यासाठी किती उर्जा लागत असेल याची कल्पनाच करवत नाही. मात्र शोभनाताई स्वतःबद्दल न बोलता आपल्या सहकार्‍यांबद्दलच भरभरुन बोलत असतात. मंडळाचे काम हे जबाबदारीचे आहे. होणारे कार्यक्रम दर्जेदार असावेत असा मंडळाचा कटाक्ष असतो. उगीचच उपायांच्या नावाखाली कुणी शोषण करीत नाही ना हे देखिल आधी बारकाईने पाहावे लागते. मंडळाच्या रजिस्ट्रेशनचे काम तर डोक्यावर आहेच. नवीन कार्यकर्त्यांना कामे देणे, त्यांना तयार करणे हे देखिल सुरुच असते. त्याशिवाय फेसबुकसारख्या सोशलसाईटवर ग्रुपस आहेत, पेजेस आहेत, इमेल्स आहेत. शोभनाताईंचा स्वतःचा पार्किन्सन्सची माहिती देणारा ब्लॉग आहे यावर त्यांचे शैलीदार लेखन सुरु असतेच. साधारणपणे या वयात माणसे तंत्रज्ञानाला नाक मुरडतात मात्र शोभनाताईंनी सोशलसाईटस आणि नेटची अनेक आधुनिक तंत्रं आत्मसात करुन ती मंडळासाठी वापरायला सुरुवात केली आहे. रुग्णांच्या घरी जाण्याच्या बाबतीत सांगताना त्याच्यातला समुपदेशक जागा होतो. अनेकदा हे जाणवते कि घरचे लक्ष देत नाहीत त्यामुळे ही रुग्ण मंडळी मानसिक दृष्ट्या खचुन गेलेली असतात. अशावेळी गोड शब्दात घरच्यांना समजवण्याची कसरत शोभनाताईंना करावी लागते. या संदर्भात बोलताना जे काही शोभनाताईंनी सांगितलं ते एखादं सूत्रवचन असल्याप्रमाणे लक्षात ठेवण्याजोगं होतं.

त्या म्हणाल्या स्वतःची सपोर्ट सिस्टीम मजबुत बनवायला हवी आणि ती आपण दुसर्‍यांशी कशा तर्‍हेने रिलेशन्स ठेवतो, वागतो त्यावर अवलंबुन आहे. त्यांच्या बाजुलाच तीन डॉक्टर्स राहतात. अगदी त्यांच्या मुलाप्रमाणे आहेत. कधीही मदतीला येतात. तिन्ही मुलींचा यांच्या कामाला पूर्ण पाठिंबा आहे. इतकेच नव्हे तर त्यांना या कामाचे कौतुक आहे, त्याबद्दल आदर आहे. त्यांचा आधार या पतीपत्नींना आहे. शेजारीपाजारी आहेतच. अगदी दुकानदारांपासुन सगळे गोपाळकाकांना ओळखतात. शोभनाताईमध्ये सोशियॉलॉजीतुन हा भाग आला असावा. पण त्या आपल्याकडे देण्याजोग्या असलेल्या गोष्टीत सर्वांना सहभागी करुन घेतात. त्यांच्या घरी हॉलमध्ये गाण्याचा वर्ग चालतो. तेथे बाहेरुन अनेक मंडळी येतात. रोज संध्याकाळी एक तास योगवर्ग चालतो. त्यासाठी बाहेच्यांना दरवाजे खुले असतात. फार काय, माझे पुण्याला काम असल्यास मी येथे येऊन राहावे असे देखिल त्यांनी मला फार आधी सांगुन टाकले होते. अशा स्वभावाच्या माणसांकडे इतर माणसे आकृष्ट झाल्यास नवल ते काय? आता मंडळाच्या कार्यक्रमात शोभनाताईंची लगबग जास्त वाढली कि प्रेमळपणे नजरेनेच दटावणार्‍या आणि त्यांना सक्तीने विश्रांती घ्यायला लावणार्‍या त्यांच्या नव्या कर्यकर्त्या मुली तयार झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल भरभरुन बोलताना शोभनाताईंना भान राहात नाही. अनेकांची नावे त्यांनी अनेक हकिकतींसहीत सांगितली. शोभनाताई या मुळच्या शिक्षिका. त्यामुळे त्यांच्यातला शिक्षक जागा असतो. आता त्यांच्या नातवालादेखिल पार्किन्सन्सबद्दल माहित झाले आहे. तो देखिल आपल्या आजोबांना गरज असेल तेथे मदत करतो. बाहेरच्या जगात काहीवेळा गैरसमजन असतात. पार्किन्सन्सच्या बाबतीत तर त्यांचा कंप पाहुन या रोगाची कल्पना नसलेली माणसे या रुग्णांना “दारु जास्त झाली आहे” अशी समजुत करु घेतात. काही उंट माणसे “प्यायची कशाला इतकी” असाही शेरा मारुन मोकळी होतात. पण शोभनाताई न चिडता, न कंटाळता अगदी रिक्षावाल्यांचे सुद्धा या आजाराबाबत प्रबोधन करतात. त्या एरीयातील काही रिक्षावाल्यांनादेखिल आता हे घर माहित झाले आहे. एकदा ही सपोर्ट सिस्टम घट्ट झाली कि माणसांना मदत मागायला आणि मदत करायला कसलाही संकोच वाटत नाही. घरात ही सपोर्ट सिस्टिम मजबुत असेल तर हा आजार आटोक्यात राहतो असे शोभनाताई म्हणाल्या. त्याचा अर्थदेखिल त्यांनी उलगडुन सांगितला.

घरात आजार्‍याला मोठ्यांकडुन तुच्छतेने हिडीस फिडीस केले जात असेल तर लहानांकडुनही तसेच वागवले जाते. या आजाराची माहिती करुन घ्यायला हवी. बरेचदा काही घरांमध्ये “हे नाटक करतात, यांना काहीही होत नाही” असा शिक्का आजार्‍यावर घरच्यांनी मारलेला असतो. पण या आजारात औषधांमुळे भास होण्याचा त्रास होऊ शकतो याची लोकांना कल्पनाच नसते. अगदी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं का येथपर्यंत लोक विचार करु लागतात. काही ठिकाणी “आम्ही काय आमचं आयुष्य यांची दुखणी काढण्यात खर्च करायचं? आम्हाला आमचं काही आहे कि नाही?” असाही प्रश्न विचारला जातो. अशावेळी संयमाने समजवावं लागतं. बरेचदा सपोर्टग्रुपच्या बाबतीत सक्सेस स्टोरीज सांगताना लोकांना भान राहात नाही. सरसकट मोठमोठे दावे केले जातात. मात्र अशावेळी शोभनाताईंमधला संशोधक जागा असतो. त्यांनी आपल्या सपोर्टग्रुपचे अनेक फायदे सांगितले. डिप्रेशन्मधुन माणसे बाहेर येतात हा सर्वात मोठा फायदा. यामुळे शरीरमनाचा होणार र्‍हास थांबतो आणि आजार आटोक्यात राहतो. मात्र काहीजण बदलत नाहीत हे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत. आजारपणाचा स्विकार केलेला नसतो त्यामुळे शरीर मनाशी झुंज घेण्यात उर्जा वाया चाललेली असते. काही ठिकाणी घरची मंडळी सपोर्टग्रुपमध्ये यायला लागल्यावर बदलतात तर काहीमध्ये फरक पडत नाही. अनेकदा वय झालेली मंडळी वृद्धपकाळामुळे काळाच्या पडद्याआड जाताना शोभनाताईंनी पाहिलीत. त्यांच्या घरी भेटायला गेल्यावर घरचे अगदी आवर्जुन कृतज्ञतेने मंडळाचा उल्लेख करतात. कारण मंडळामुळे त्यांच्या माणसाचं आयुष्य सुकर आणि सुंदर झालेलं असतं. अनेकांना आपल्या आजारी माणसासाठी मंडळ हा फार मोठा आधार वाटतो. डिप्रेशनच्या विषयावर शोभनाताई खुप बोलल्या. रुग्णाला डिप्रेशन येऊ नये म्हणुन कल्पक उपाय शोधुन काढावे लागतात. गोपाळकाकांचं अक्षर फार सुरेख. त्यामुळे मंडळासाठी हस्तलिखित पत्रं लिहिण्याच्या कामात ते रमुन जातात. त्या काकांना कधीही एकटे ठेवत नाहीत. डिप्रेशनमुळे माणुस अंथरुणाला खिळु शकतो आणि आजार देखिल भराभर वाढु शकतो. डिप्रेशन हे या रोगाचे लक्षणच आहे त्यामुळे त्याबाबतीत जपावे लागते. छोट्या छोट्या जुलाबासारख्या आजारानेही यांना डिप्रेशन येऊ शकतं. त्याची काळजी घ्यावी लागते. गोपाळकाका मात्र याबाबतीत अगदी आदर्श आहेत.

सकाळी समोरच्या उद्यानात जाऊन हास्यक्लब आणि व्यायाम ते नियमित घेतात. संध्याकाळी प्राणायामाचा वर्ग असतोच. ते अजुन अजुन पर्यंत कार चालवीत असत. काकांशी बोलताना त्यांनी वारंवार “एक्सेप्टन्स” हा शब्द वापरला. त्यांच्यामते या आजाराचा स्विकार ही आजार आटोक्यात ठेवण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट. एकदा स्विकार केला कि मैत्री करता येते आणि पुढच्या गोष्टी सुलभ होऊन जातात. या स्वभावामुळेच गोपाळकाका हे अनेक रुग्णांचे रोलमॉडेल झाले आहेत. शोभनाताईंबरोबर ते स्वतः अनेकदा रुग्णांना भेटण्यासाठी जातात. त्यामुळे फार फरक पडतो. सकारात्मक गोष्टी ऐकण्याकडे, पाहण्याकडे काकांचा कटाक्ष आहे. त्यामुळे शोभनाताई अशा तर्‍हेच्या गोष्टी समोर ठेवीत असतात. काकांसाठीच नाही तर अनेकदा असे मोटीवेट करणारे विडिओज त्या इतरांसाठीही फेसबुकवर टाकतात. गोपाळकाकांना मी जेव्हाही पाहीलं उत्साहातच पाहिलं होतं. बाकी पार्किन्सन्सची माहीती ऐकताना हे देखिल लक्षात आलं कि शोभनाताईंनी याचा प्रचंड अभ्यास केला आहे. अगदी सहजपणे त्यांच्या तोंडुन तांत्रिक संज्ञा बाहेर पडत होत्या. औषधोपचार, शस्त्रक्रिया आणि आजारासंबंधी इतरही माहीती या समाजशास्त्र आणि शिक्षण या विषयात एम ए, एम फील आणि पी एचडी झालेल्या शोभनाताईंच्या जिभेवर सहजपणे खेळत होती.

बोलता बोलता बराच वेळ उलटला होता. शोभनाताईंना माझ्यासाठी काहीतरी खायला करायचं होतं. मग त्यांनी मला स्वयंपाक घरात येऊन समोर बसायला सांगितले. गप्पा पुन्हा सुरु झाल्या. घराला तोच गावच्या घरगुतीपणाचा खुप हवाहवासा वाटणारा सुवास होता. मोठमोठी जुनी भांडी नॉस्टाल्जिक करीत होती. बाजुच्या भिंतीवर एक लंबकाचं चावीवर चालणारं घड्याळ होतं. शोभनाताई मला रात्रीच्या प्रवासात डबाही बांधुन देणार होत्या त्यामुळे पिठल्याची तयारी चालली होती. गोपाळकाका बारिकसारीक कामात त्यांना मदत करत होते. तेवढ्यातच त्यांनी माझ्यासाठी खायला काढले. मुरंबा काढला. शोभनाताईंनी उप्पीट वाढुन दिले. काकांनी हॉलच्या पायर्‍यांवरच दोन नारळ फोडले. त्यातला थोडासा नारळ खवुन शोभनाताईंनी उप्पिटावर पसरुन डिश माझ्यापुढे केली. पिठल्याचा सुगंध सुटला होता. शोभनाताईंनी पिठले चाखायला दिले. चविष्ट झाले होते.मध्येच मी त्यांचा प्रशस्त हॉल पाहुन आलो. तेथे ठेवलेली पुस्तके पाहिली. खाली आलो. त्यांनी मला पोळी आणि पिठले बांधुन दिले आणि मी निघण्याची तयारी केली. त्यांच्यासाठी आणलेली फळे गोपाळकाकांच्या हातात देऊन त्यांच्या पाया पडलो. मग शोभनाताईंच्या पाया पडलो. आणि निघालो. बरोबर मला रिक्षा मिळवुन देण्यासाठी गोपाळकाका आले होते. त्यांनी खणखणीत आवाजात रिक्षाला हाक मारली. रिक्षा सुरु झाली. आणि विचारचक्रही सुरु झाले. आता वाटते या दोघांमध्ये स्वतःच्या दु:खावर मात करुन दुसर्‍यांना मदत करण्याची जी कळकळ आहे ती काही अंशी तरी माझ्यात उतरेल काय? असाच आशीर्वाद त्यांनी मला द्यावा. मुंबईकडे जाणार्‍या बसमध्ये बसलो. रात्र झाल्यावर शोभनाताईंनी दिलेला डबा उघडला. पिठले घट्ट झाले होते. आमच्यातील स्नेहबंधासारखेच…

अतुल ठाकुर

डॉ. शोभनाताई तीर्थळी यांच्या संस्थेचे संकेतस्थळ

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments