Homeलेखमित्रांनो माझं नाव अमुक अमुक आणि मी एक बेवडा आहे...

मित्रांनो माझं नाव अमुक अमुक आणि मी एक बेवडा आहे…

समोर सत्तर ऐशी लोकांचा जमाव बसलेला. त्यात काही ओळखीचे काही अनोळखी, काही आजच आलेले, जमावात स्त्रियांची संख्याही बर्‍यापैकी. असं असताना कुणालातरी बोलायला उठवलं जातं. तो समोर येतो आणि पहिलं वाक्य टाकतो,”मित्रांनो माझं नाव अमुक अमुक आणि मी एक बेवडा आहे”. त्यानंतर काही जण “हाय अमुक अमुक” असं म्हणुन त्याला सलामी दिल्यासारखं त्याचं स्वागत करतात. बर्‍याच जणांना, जे तेथे नवीन आलेले असतात, धक्काच बसत असेल. हे वाचणार्‍यांनाही कदाचित विचित्र वाटत असेल. त्या जमावात जेव्हा सुरुवातीला मी बसत होतो तेव्हा मलाही हे जरासं चमत्कारीकच वाटत असे. अनेक शंका मनात येत. आपण बेवडे आहोत हे ही माणसं असं सर्वांसमोर धाडकन कसं काय सांगतात? बरं आता इतकी वर्षे सोबर राहिल्यावरसुद्धा आपण बेवडे आहोत हे सांगण्याची गरज काय? असे अनेक प्रश्न पडत. पण मुक्तांगणचा ठाणे सपोर्ट ग्रुप अटेंड करत गेलो आणि प्रश्नांची उत्तरे मिळत गेली. “मी एक बेवडा आहे” या वाक्यामागचं शास्त्र लक्षात आलं. या निमित्ताने प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ कार्ल जुंग याचं एक विधान आठवलं We cannot change anything until we accept it. आपण कुठलिही गोष्ट तोपर्यंत बदलु शकत नाही जोपर्यंत आपण ती स्विकारत नाही. परिस्थितीचा स्विकार ही परिस्थिती बदलण्याची पहिली पायरी आहे. त्याचप्रमाणे व्यसनाच्या आजाराचा स्विकार ही त्यापासुन मुक्त होण्याची पहिली पायरी मानायला हवी. मात्र या आजाराचा स्विकार ही सोपी गोष्ट नसते. व्यसनी माणुस तर हा स्विकार लवकर करीत नाही हे एकवेळ समजता येते पण समाजदेखिल व्यसनाचा आजार म्हणुन स्विकार लवकर करीत नाही असा अनुभव आहे. व्यसनमुक्तीचा मार्ग हा दुहेरी असतो. आधी व्यसन हा आजार आहे हे रुग्णमित्राने आणि समाजाने मान्य करणे. त्यानंतर हा आजार आपल्याला झाला आहे हे रुग्णमित्राने स्विकारणे आणि ते समाजानेदेखिल स्विकारणे. ही बाब अशक्य नसतेच पण अवघड अशासाठी असते कि आपल्यापैकी बहुतेकांना बौद्धीक तर्क लढवुन निष्कर्ष काढण्याची सवय असते. अनुभव किंवा याबाबतीतले शास्त्रिय वाचन नसते. त्यामुळेच मुक्तांगणला दाखल होताना व्यसनमुक्त होण्याची गॅरेंटी द्याल का अशासारखे प्रश्न हमखास विचारले जातात. आणि अशी अपेक्षा असते कि काहीतरी असा औषधोपचार असेल ज्याने आपलं माणुस कायमचं बरं होईल. ही अपेक्षा अगतिक झालेल्या कुटुंबियांकडुन असणे ही साहजिक बाब आहे. अशावेळी आमचे वायंगणकरसर जे रिसेप्शनला बसलेले असतात त्यांना कुटुंबियांचं समुपदेशन करावं लागतं. तेव्हा याबाबत मुक्तांगणचा दृष्टीकोण काय आहे हे समजुन घेणे आवश्यक आहे.

सर्वसामन्यपणे माणसं असं म्हणतात कि मुक्तांगणमध्ये व्यसनावर उपचार होतो. त्यात तथ्य आहेच. पण खोलात जाऊन सांगायचं तर असं म्हणायला हवं कि मुक्तांगणमध्ये ज्यामुळे माणुस व्यसनाकडे ओढला जातो त्या स्वभावदोषांवर उपचार होतो. कारण व्यसनावर या जगात कुठलेही औषध उपलब्ध नाही हे मुक्तांगणमध्ये आधीच सांगीतलं जातं. त्यामुळे मुक्तांगणचा भर हा स्वभावदोषांवर काम करुन माणसाला व्यसनमुक्त करण्यावर असतो हे आधी लक्षात घ्यायला हवं. स्वभावदोषांवर काम करण्यासाठी रुग्णाची तयारी असायला हवी. यासाठी मुक्तांगणला दाखल होताना तेथे एक प्रश्न समुपदेशक नेहेमी विचारतात कि रुग्णाची दाखल होण्याची इच्छा आहे कि नाही? जबरदस्ती करुन फारसा उपयोग होणार नसतो. रुग्णाची दाखल होण्याची इच्छा असेल तर मात्र रिझल्टस चांगले मिळण्याची शक्यता वाढते. अशा वेळी काहींना असं वाटण्याची शक्यता आहे कि कुटुंबाचे आणि स्वतःचे शारीरिक, मानसिक, आर्थिक अतोनात नुकसाने केलेल्या व्यसनी माणसाला व्यसन सोडावेसे वाटते का हे विचारण्याची गरज काय? त्याला ते सोडावेसे वाटणारच. खरं म्हणजे प्रकार नेमका या उलट असण्याची शक्यता असते. बायको रडवेली झालेली आहे, दारुपायी जबरदस्त नुकसान झालेले आहे आणि समोर समुपदेशक कळकळीने विचारताहेत काय दारु सोडाविशी वाटते कि नाही? समोरच्या व्यसनी माणसाच्या चेहर्‍यावर कसलेही हावभाव उमटत नाहीत. व्यसनाची मगरमिठी इतकी जबरदस्त बसलेली असते कि ते सोडावेसे वाटते हे सांगणे देखिल अनेकांच्या जिवावर येत असेल. हा त्या स्वभावदोषाचाच एक भाग आहे ज्यावर मुक्तांगण मध्ये उपचार होतात. एकदा माझ्या समोर दारु सोडायची आहे का असा प्रश्न वारंवार विचारला गेल्यावर रुग्णाने उत्तर दिले “थोडी कमी करायची आहे.” त्यामुळे व्यसनाला कारणीभुत झालेले स्वभावदोष दुर करणे हे सोपे काम नाही. अनेक वर्षे व्यसनात राहुन हे स्वभाव खडकासारखे कठोर बनलेले असतात. त्यावर अहंकाराची पुटं चढलेली असतात. हा अहंकार आणि त्याबरोबर असलेले स्वभावदोष हे वितळवण्याची प्रक्रिया मुक्तांगणमध्ये केली जाते. त्यात अनेक पायर्‍या आहेत. या लेखाच्या मर्यादेत त्यांच्या तपशीलात जाता येणार नाही. मात्र त्यातल्या पहिल्या पायरीचा विचार येथे करता येईल. व्यसनमुक्त होण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्याला व्यसनाचा आजार आहे या सत्याचा स्विकार.

आपल्याला व्यसनाचा आजार आहे हे स्विकारणं तर पुढचा टप्पा झाला. मुळात आपण व्यसनी आहोत हेच रुग्ण नाकबुल करत असतो. त्यासाठी खोट्या शपथा घेणे यापासुन ते काही दिवस नेटाने व्यसनापासुन दुर राहण्याच्या सर्व क्लुप्त्या वापरल्या जातात. वादविवादात ही मंडळी कुणालाच हार जात नाहीत. तुलना सुरु होते. तो दारु पिऊन रस्त्यात पडतो मी पडतो का? तो मारामार्‍या करतो मी करतो का? तो शिवीगाळ करतो मी करतो का? तो कामावर जात नाही. मी तर नियमित कामावर जातो मग मी व्यसनी कसा? अशा तर्‍हेचे दाखले दिले जातात. मग काही वेळा मी माझ्या पैशाने पितो आणि घरात त्रास देत नाही मग मी व्यसनी कसा? मला मुक्तांगणची गरजच नाही असं हे रुग्ण जाहीर करतात. त्यातुनही हे मुक्तांगणला आलेच तर मनातुन आपण व्यसनी नाहीच. आपल्याला येथे उगाचच आणलं गेलंय हे काहींच्या मनात राहतंच. आपण व्यसनी नाही आहोत ही भावना मनात राहणं ही उपचाराच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही कारण अशी भावना असलेला रुग्ण मनापासुन उपचारात सहभागी होत नाही आणि कदाचित मुक्तांगणमधुन बाहेर पडल्यावर पुन्हा व्यसनाकडे वळतो. त्यामुळे व्यसनाचा आजार आपल्याला आहे या सत्याचा स्विकार सर्वार्थाने करायला लावणं हे अतिशय जिकिरीचं काम मुक्तांगणमध्ये केलं जातं. या सत्याचा स्विकार अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. आजवर तरी व्यसनातुन बाहेर काढणारं औषध जगात उपलब्ध नाही. तोपर्यंत एखाद्या मधुमेहाच्या किंवा रक्तदाबा असलेल्या रुग्णाने ज्याप्रमाणे पथ्यपाणी राखुन आपला आजार आटोक्यात ठेवावा त्याप्रमाणे व्यसनाचा आजार आटोक्यात ठेवावा लागतो. म्हणुनच “रिकव्हरींग अ‍ॅडिक्ट” असा शब्द वापरतात. हा आजार आटोक्यात ठेवुन मात्र अगदी सर्वसामान्य आयुष्य जगता येतं, उपभोगता येतं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मधुमेह आणि रक्तदाबाशी केलेली तुलना ही फक्त आजार आटोक्यात ठेवावा लागतो हे समजण्यापुरतीच आहे. हा आजार आटोक्यात ठेवण्यासाठी जे पथ्य करावं लागतं त्यात अतिआत्मविश्वास येऊ न देणं ही महत्त्वाची बाब आहे. जर आता मी दहा वर्षे झाली, दारुला शिवलेलो नाही, त्यामुळे मी संपूर्ण बरा झालो आहे अशी भावना झाली तर पुढची पायरी असते आता थोडीशी घ्यायला काय हरकत आहे? आपला इतकी वर्ष तर स्वतःवर ताबा आहेच. हे आणि असे विचार डोक्यात सुरु झाले तर ते कृतीत यायला वेळ लागत नाही आणि मग पुढे व्यसनात माणुस पुन्हा गुरफटतो. त्यासाठी स्वतःला ही जाणीव करुन द्यायची असते कि “मी एक बेवडा आहे”.

मी एक बेवडा आहे याची जाणीव असायला हवी याचं आणखि एक महत्त्वाचं कारण आहे. मुक्तांगणमध्ये माणसे मुक्तांगणच्या व्यसनमुक्त वातावरणात राहतात. तेथे तंबाखु देखिल मिळत नाही. ती खाण्यास बंदी आहे. मात्र बाहेर पडल्यावर तेच मित्र आणि तोच रस्ता आणि तोच बार पुन्हा पुन्हा दिसणार असतो. आपल्याला खुणावणार असतो. मित्रांच्या पार्ट्या होणार असतात. आपल्याला आमंत्रणं येणार असतात. सोशल ड्रिंकर असलेले मित्र आपल्यासमोर दारु पिणार असतात. शक्य तोवर हे टाळायचंच असतं पण हे नेहेमी टाळणं शक्य होईलच असं नाही. अशा वेळी मनात हे ठाम असायला हवं कि आजुबाजुचे कितीही दारु पिऊ देत, आता ही दारु आपल्यासाठी नाही. बाकीचे काही प्रमाणात दारु घेतल्यावर थांबु शकतात. पण आपल्याला व्यसनाचा आजार आहे. आपण ग्लास तोंडाला लावला कि आपण त्यांच्यासारखं थांबु शकत नाही. त्यामुळे आजुबाजुला कितीही मोहाचे क्षण आले तरीही मनाला समजवायला हवं कि आता हा आपला रस्ता नाही. जेव्हा मुक्तांगणचे मित्र सर्वांसमोर हे म्हणतात कि मी एक बेवडा आहे तेव्हा ते स्वतःलाच याची जाणीव करुन देत असतात कि व्यसनाचा आजार आपल्याला आहे हे सत्य त्यांनी स्विकारलं आहे. हे ऐकताना अनेकांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतात. आपण बेवडे आहोत हे काय सगळीकडे सांगायचं का? मुळीच नाही. हे फक्त स्वतःच्या मनाला सांगायचं. आणि मुक्तांगणमित्रांच्या फॉलोअप मिटींगमध्ये सांगायचं. तेथे आपल्यासारखीच व्यसनाचा आजार असणारी आणि तो आटोक्यात ठेऊन निरोगीपणाने आनंदात जगणारी मंडळी असतात. ही सर्व आपली माणसं आहेत. त्यांच्यासमोर आपल्या आजाराचा स्विकार करुन आपण व्यसनमुक्त राहण्याचा आपला मार्ग आणखि सोपा करत असतो. कारण हे मनात ठेवल्याने आपण मोहापासुन सावध राहणार असतो. काहीजण म्हणतात एकदा आपण व्यसन सोडलं तर पुन्हा आपण बेवडे आहोत हे म्हणण्याची आवश्यकता काय? खरं तर असा तर्क करणार्‍यांना व्यसनाचा चिवटपणा माहित नसतो. निव्वळ दारुपासुन दुर राहणार्‍यांना मुक्तांगण व्यसनमुक्त म्हणत नाही. तो माणुस डोक्यात दारुचा विचार घोळवु शकतो. अशांना ड्राय ड्रंक म्हणतात. आणि हे व्यसनाचे सततचे विचार घात करु शकतात. त्यामुळेच व्यसन सुटुन कितीही वर्षे झाली तरी माणसे मी एक बेवडा आहे असे सर्वांसमोर म्हणतात आणि त्यामुळे ती अतिआत्मविश्वासाच्या आहारी जात नाहीत.

बेवडा हा शब्द साधा नाही. समाज हा शब्द तुच्छतेने वापरतो. नेमका हाच शब्द व्यसनाच्या आजाराचा स्विकार करण्यासाठी वापरण्यामागेदेखिल कारण असावं अशी माझी समजुत आहे. व्यसनी रुग्णमित्रांची टवाळी करण्यासाठी हा शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा त्यांना ते जिव्हारी लागुन किती वेदना होत असतील. याच शब्दाचा स्विकार जेव्हा ही माणसे आपला आजार म्हणुन करतात तेव्हा ते त्यातले विषच कायमचे काढुन टाकतात. आता कुणीही हा शब्द त्यांच्यासाठी वापरल्यास त्याचा त्यांना त्रास होणार नसतो. याच संदर्भात शेवटी मुक्तांगणच्या संचालिका मुक्तामॅडमनी सांगीतलेली एक गोष्ट आठवते आहे. मुक्तांगणमधुन एक रुग्णमित्र उपचार घेऊन घरी परतला. कामावर रजु झाल्यावर काहींनी त्याची टिंगल टवाळी करायला सुरुवात केली. अरे बघा बेवडा आला असे कुचेष्टेचे उदगार निघु लागले. ऐरागैरा असता तर गांगरला असता, संतापला असता आणि नक्कीच डोक्यात राख घालुन कदाचित व्यसनाकडे पुन्हा वळला असता. पण या मुक्तांगणमित्राने आपल्याला व्यसनाचा आजार आहे हा स्विकार सर्वार्थाने केला होता. तो शांतपणे त्यांना म्हणाला कि होय मी बेवडा आहे. त्याची आठवण करुन दिल्याबद्दल आभार. नेहेमी अशीच आठवण करुन देत जा म्हणजे मी व्यसनमुक्तीच्या वाटेवरुन ढळणार नाही. हे ऐकल्यावर चिडवणार्‍यांचे चेहरे पडले असतील. या गोष्टीमागे फार मोठं सत्य दडलं आहे असं मला वाटतं. उपचार घेऊन मुक्तांगणच्या बाहेर पडल्यावर तुम्हाला कशाला तोंड द्यावं लागेल ते सांगता येणार नाही. माणसं मोह पाडतील, जुने अड्डे पुन्हा आठवणी जाग्या करतील. काही सण आपल्याला बेचैन करतील, काही प्रसंग अनावर करतील अशावेळी “मी एक बेवडा आहे” हा स्विकार आपल्या मर्यादांचे भान आणुन देईल. कारण आपल्या मर्यादांचे भान हीच व्यसनमुक्त राहण्याची पहिली पायरी आहे असे मला वाटते.

अतुल ठाकुर

मुक्तांगण संस्थेची वेबसाईट

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments